IND v WI 5th ODI : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे वेस्ट इंडीजचा दारुण पराभव; भारताचा सलग सहावा मालिका विजय

तिरुअनंतपुरम:

ग्रीनफिल्ड मैदानावर झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून धुव्वा उडवत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-१ जिंकत मायदेशात सलग सहाव्या मालिका विजयाची नोंद केली.

वेस्टइंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे वेस्टइंडीज संघ 104 धावांत गारद झाला.

वेस्टइंडीजच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. वेस्टइंडीजचा संपूर्ण संघ 31.4 षटकात सर्वबाद 104 धावा करू शकला.

रवींद्र जडेजाने चमकदार कामगिरी करत 9.5 षटकात 31 धावा देत वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याला जसप्रीत बुमराह आणि खलील अहमदने दोन दोन गडी बाद करत चांगली साथ दिली.

105 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या भारताची सुरुवातही खराब झाली.या मालिकेत खराब कामगिरीचे प्रदर्शन करणारा शिखर धवन आजही अपयशी ठरला. शिखर 5 चेंडूत ६ धावा करत थॉमसचा शिकार झाला.

चौथ्या एकदिवसीय सामन्यात 162 धावांची खेळी करणार्या रोहित शर्माने आजही आपला जलवा दाखवत नाबाद 56 चेंडूत 63 धावांची खेळी केली. रोहितने या खेळीत 5 चौकार आणि चार षटकार लगावले.

कर्णधार विराट कोहलीने 29 चेंडू 33 धावांची खेळी करत पाच खणखणीत चौकार खेचले. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 99 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाचा पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-1 असा पराभव करत भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मायदेशात सलग सहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

%d bloggers like this: