Asian Hockey champion :- मेघराजाच्या व्यत्ययामुळे प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानला ‘संयुक्त जेतेपद’

ओमान –  मस्कत येथे पार पडलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शनिवारी भारताने जपानचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांना संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागले.

भारतीय संघाने या स्पर्धेत एकूण सहा सामने खेळून एकदाही पराभूत न होता अंतिम फेरीत प्रवेश करण्याची किमया केली होती.

पहिल्या सामन्यात ओमानचा 11-0 असा धुव्वा उडवत या स्पर्धेत भारताने दणक्यात सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 3-1 असे नमवले तर तिसऱ्या सामन्यात जपानचा 9-0 असा धुव्वा उडविला.

23 ऑक्टोंबरला मलेशिया आणि भारत यांच्यामध्ये झालेला सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. दोन्ही संघाला एकही गोल करता आला नव्हता.

5 व्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. भारताने शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत जपानचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला होता.

या स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले असून 4. 84 च्या सरासरीने 92 गोल झाले आहेत. तसेच 6 सामन्यात भारताच्या नावावर सर्वाधिक 30 गोलची नोंद आहे.

या आधी भारत पाकिस्तानने 2 वेळा जिंकली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी –

भारताने दोन वेळा (2011,2016 साली) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले असून पाकिस्तानीनेही दोन वेळा (2012,2013) जिंकला आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ तगडे आव्हान देणार असल्याने चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले होते मात्र मेघराजाच्या हजेरीमुळे सामना रद्द करण्यात आला.

दीड तासाहून अधिक काळ प्रतीक्षा करुनही मेघराजाने थांबायचे नाव न घेतल्यामुळे दोन्ही संघांना ‘संयुक्त विजेता’ घोषित करण्यात आले. याबरोबरच आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा तिसऱ्यांदा आपल्या नावावर करण्याची संधी मेघराजाने भारताकडून हिरावून घेतली.

%d bloggers like this: