INDvsWI 2nd ODI :’विराट’ कामगिरीनंतर सामना टाय; शाय होप आणि हेटमायरची झुंज अपयशी

विशाखापट्टणम मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शाय होपने झुंजार खेळाचे प्रदर्शन करत शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत सामना बरोबरीत सोडला.

भारतीय सलामीवीर स्वस्तात तंबूत परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायडू यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला.

अंबाती रायडूने 80 चेंडूत 73 धावांची खेळी केल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारण्याच्या प्रयत्नात तो नर्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या महेंद्रसिंग धोनीने 25 चेंडूत 20 धावांची खेळी केल्यानंतर ओबेड मेकोईने टाकलेल्या ‘बॅक ऑफ द स्लॉवर’ चेंडूवर धोनी त्रिफळाचित झाला.

ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत असताना रनमशीन विराट कोहलीने डावाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली.

विराट कोहलीने नाबाद 127 चेंडूत 157 धावांची तुफानी खेळी करत भारताला 321 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.

विराट कोहलीने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत सर्वात जलद (205 डाव) दहा हजार धावांचा टप्पा पार केला. याबरोबरच तो अशी कामगिरी करणारा भारतचा चौथा खेळाडू ठरला.

शेवटच्या 10 षटकांत तळाच्या फलंदाजांना सोबत घेत ‘किंग’ कोहलीने 100 धावा कुटल्या.
भारताने निर्धारित 50 षटकात 4 बाद 322 धावा केल्या.

322 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या वेस्टइंडीज संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामवीराबरोबरच अनुभवी सॅम्युअल संघाची धावसंख्या 78 असताना तंबूत परतले.

पहिल्या कसोटीत आपली छाप पाडणारा शतकवीर हेटमायर आणि शाय होप यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या 143 धावांच्या भागीदारीच्या जोरावर वेस्टइंडीज संघाला या सामन्यावर पकड मिळवून दिली.

हेटमायरने याही सामन्यात आपला झंजावत दाखवत 64 चेंडूत 94 धावांची झुंजार खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार तर तब्बल सात षटकारांची आतषबाजी केली.

वेस्टइंडीज संघाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 20 धावांची गरज होती. 49 व्या षटकात मोहम्मद शमीने सहा धावा देत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.

50 व्या षटकात उमेश यादवने भेदक मारा केला परंतु शेवटच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना शतकवीर फलंदाज शाय होपने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सोडला.

शाय होपने झुंजार खेळाचे प्रदर्शन करत नाबाद 134 चेंडूत 123 धावांची खेळी केली मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरला.

भारतीय संघाकडून कुलदीप यादव ने 10 षटकात 67 धावा देत तीन गडी बाद केले.

धावफलक: –

भारत:-

विराट कोहली नाबाद 127 चेंडूत 157 धावा
अंबाती रायडू 80 चेंडू 73 धावा

वेस्टइंडीज :-
शाय होप नाबाद 134 चेंडूत 123 धावा
हेटमायर 64 चेंडूत 94 धावा
कुलदीप यादव 69 धावात 3 बळी

%d bloggers like this: