OPINION | होय, मी मराठा आहे आणि मी हिंसेच्या विरोधात आहे

मराठा क्रांती मोर्चाने आज अखेर महाराष्ट्र बंदची हाक दिली. महाराष्ट्रभर 58 मोर्चे काढल्यानंतर आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज हे पाऊल उचलणार हे निश्चितच होते. आणि अखेर मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिलीच. काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले. त्यानंतर मराठा समाजाने कठोर भूमिका घेतली आणि त्याचे रूपांतर बंदमध्ये झाले.

महाराष्ट्र बंद दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड, रेल रोको यासारख्या हिंसेच्या घटना घडल्या. पण खरचं, आरक्षण मिळविण्यासाठी या हिंसाचाराची, तोडफोडीची गरज आहे? कदाचित नाही. तोडफोड करून आपण कोणाचे नुकसान करत आहोत? महाराष्ट्राचेच ना. ज्या शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मराठा समाज आज लढत आहे. त्याच शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला आहे. महाराजांमुळेच आज महाराष्ट्राला सातासमुद्रापार ओळखले जाते आणि त्याच महाराष्ट्रात आपण आंदोलनाच्या नावाखाली हिंसा, जाळपोळ करत आहोत. कदाचित खरा मराठी बांधव कधीच हिंसा करणार नाही.

होय, मी मराठा आहे; पण माझा हिंसेने प्रश्न सुटतील यावर विश्वास नाही. कदाचित मी मराठा आहे, या जागी मी, ‘मी भारतीय आहे’ असे लिहायला हवे. कारण मराठा, दलित, अशा अनेक जातीना चिटकून राहून आपण आपलाच समाज मागे नेत आहोत.

आज काल बंद अथवा अन्य कोणत्याही कारणांच्यावेळी व्हाॅट्स अॅपवर वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवण्याची पध्दत सुरू आहे. आजही महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर अनेक ग्रुपचे डिपी (फोटो) बदलण्यात आले. भगवा शर्ट आणि हातात तलवार असा तो फोटो.

हा फोटो ठेऊन आपण काय साध्य करतोय? रंग कोणताही असो, भगवा, हिरा अथवा निळा त्याने काहीही फरक पडत नाही. पण तलवार घेऊन उभ्या असलेल्या माणसाचा फोटो ठेऊन आपण किती चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देतो हे आपण विसरतोय. आपल्याच समाजातील भावना आपण दुखावतोय. आपल्याच लोकांमध्ये आपण तेढ निर्माण करतोय याची जाणीव आपल्याला कधी होणार ?

काही लोक आंदोलनाविषयी काहीतरी चुकीचे विधान करून लोकांना भडकवण्याचे काम करतात.

स्वतःच्या बुध्दीहीनतेचे प्रदर्शन करण्याची संधी असे लोकं सोडत नसतात. दुसऱ्यांना भडकावून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या लोकांद्वारे केला जात असतो. अशा लोकांच्या बुध्दीची कीव येते.

कोणतेही प्रश्न हे हिंसेने सुटत नसतात हे आपल्याला कधी कळणार? गुजरातमधील पटेल समाज असो की, हरियाणामधील जाट समाज असो यांच्या हिंसक आंदोलनाने काय साध्य झाले ? काहीच नाही. आजही त्यांना आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे हिंसेने, तोडफोड करून आपण आपल्याच समाजात, देशात तेढ निर्माण करत आहोत.

कदाचित येणाऱ्या पिढीला हा हिंसेचा इतिहास वाचायला आवडणार नाही.

%d bloggers like this: