पाकिस्तान संघाचा मालिका विजय; शाहिन आफ्रिदीची चमकदार कामगिरी

दुबई :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाचा 6 गड्यांनी पराभूत करत 3 टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी 5.5 षटकात पहिल्या‌ विकेटसाठी 50 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.

चांगल्या सुरुवातीनंतर न्यूझीलंड संघाला लागोपाठ बसलेल्या दोन धक्क्यामुळे फलंदाजांनी सावध पवित्रा घेतला.

सलामीवीर मुनरोने चार चौकार आणि दोन षटकाराच्या साहाय्याने 28 चेंडूत 44 धावांची दमदार खेळी केली. पहिल्या विकेटसाठी केलेल्या 50 धावांच्या भागीदारीमध्ये मुनरोचा दुसरा साथीदार ग्लेन फिलिप्सचा फक्त 5 धावांचा वाटा होता.

मुनरोला ऑफ स्पिनर मोहम्मद हाफिजने बाद करत त्याची वादळी खेळी संपुष्टात आणली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 34 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले.

ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला असताना कोरी अँडरसनने केलेल्या 25 चेंडूत 44 धावांच्या जोरावर न्‍यूझीलंड संघाने 153 धावांपर्यंत मजल मारली.

शाहिन आफ्रिदीने घेतले 4 षटकात 4 बळी- 

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदीने 4 षटकात 20 धावा देत न्यूझीलंडच्या चार खेळाडूंना तंबूत पाठवले. मोहम्मद हाफिज आणि इमाद वसीमने 1-1 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

154 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फकर जमान 15 चेंडूत 24 धावांची खेळी करत पहिल्या विकेटच्या रूपात बाद झाला. त्याला माईलने बाद केले.

बाबर आझम 41 चेंडूत 40 तर असिफ अलीने 34 चेंडूत 38 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी करत पाकिस्तान संघाच्या डावाला आकार दिला.

अनुभवी मोहम्मद हाफिजने नाबाद 21 चेंडूत 34 धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला.

न्युझीलंड संघाकडून माईलने दोन तर साऊथी आणि मुनरोने एक-एक गडी बाद केला.

न्‍यूझीलंड संघाने दिलेले 154 धावांचे आव्हान पाकिस्तान संघाने 19.4 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या विजयाबरोबरच पाकिस्तान संघाने 3 टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

%d bloggers like this: